
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज तथा तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीने तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव येथे ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेक उमेदवारांना रोजगाराच्या संधी यामाध्यमातून उपलब्ध झाल्याचा आनंद आहे.
या रोजगार मेळाव्यासाठी धाराशिव जिल्ह्यातून आणि जिल्ह्याबाहेरून तब्बल ७२१ जणांनी नोंदणी केली होती. यावेळी निवड प्रक्रियेद्वारे १९७ जणांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. त्यापैकी काही उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरीत करण्यात आले असून इतर उमेदवारांना देखील लवकरच नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.
या रोजगार मेळाव्यात खाजगी क्षेत्रातील २२ नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने पुणे, मुंबई, सोलापूर, बार्शी, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यातील कंपन्यांचा समावेश होता.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP), महिला आर्थिक विकास महामंडळ, विश्वकर्मा योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आदी योजनांची माहिती देणारे स्टॉल देखील लावण्यात आले होते. तसेच तेरणा ड्रोन कृषी प्रशिक्षण केंद्राच्या वतीने ‘ड्रोन कृषी सेवा केंद्र’ बाबत देखील उपस्थित उमेदवारांना माहिती देण्यात आली.