सैफच्या घरात कुठून अन् कसा घुसला, जेहच्या खोलीपर्यंत कसा पोहोचला? पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपी घडाघडा बोलला

Saif Ali Khan Attacked: सीसीटीव्हीचं जाळं एवढं सगळं भेदून चोरटा थेट घरात घुसून चाकू हल्ला करतोच कसा? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत होते. अखेर आता सर्व प्रश्नांची उत्तर पोलीस चौकशीतून समोर आली आहेत. आता आरोपीनं याबाबत खुलासा केला आहे.
Saif Ali Khan Attack Case: सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) घरात घुसून त्याच्यावर हल्ला करुन पळ काढणाऱ्या आरोपीच्या तीन दिवसांनी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. कुणी एखादा भुरट्या चोर थेट सेलिब्रिटीच्य घरात घुसतोच कसा? इमारतीच्या गेटवर सुरक्षारक्षकांचा वेढा, सीसीटीव्हीचं जाळं एवढं सगळं भेदून चोरटा थेट घरात घुसून चाकू हल्ला करतोच कसा? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत होते. अखेर आता सर्व प्रश्नांची उत्तर पोलीस चौकशीतून समोर आली आहेत.
सैफ अली खानवरच्या तपासातली एक्स्क्लुजीव माहिती ABP ‘माझा’च्या हाती लागली आहे. हल्लेखोर महोम्मद शहजादानं स्वतः यासंदर्भात माहिती दिली आहे. पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपीनं सर्वच सांगितलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनं त्याच्या जबाबात सांगितलं की, काही दिवसांपूर्वीच आरोपीनं वांद्र्यातील एका हॉटेलमध्ये काम करायला सुरुवात केली होती. शिफ्ट संपल्यानंतर रात्री उशीरा तो वांद्र्याच्या परिसरात पायी चालत फिरायचा. असाच एक दिवस तो, चालत चालत सैफ राहत असलेल्या इमारतीजवळ पोहोचला. त्याच्या लक्षात आलं की, इमारतीच्या मागच्या बाजूला कोणताही गार्ड किंवा सीसीटीव्ही फुटेज नाही, हे पाहिल्यानंतर तो सैफच्या घरात घुसला. पार्किंग एरियातून, तो पायऱ्यांजवळच्या फायर एग्जिटजवळ पोहोचला. तसाच वर बाराव्या मजल्यावर गेला. तिथे गेल्यानंतर त्याचा डक्ट एरियामध्ये जाण्याचा रस्ता मिळाला आणि तिथून प्रवेश केल्यानंतर तो थेट सैफ अली खानच्या घरातील बाथरुमच्या आतमध्ये पोहोचला. आरोपीनं सांगितलं की, तो फक्त चोरीच्या उद्देशानं तिथं गेला होता. पण, अचानक गोंधळ उडाला आणि घरातील सर्वजण जागे झाले. त्यानंतर भेदरलेल्या चोरानं स्वरक्षणासाठी सैफ अली खानवर हल्ला केला.” दरम्यान, आरोपी खरं बोलतोय की, खोटं हे शोधण्यासाठी पोलीस त्यावेळचा क्राईम सीन रिक्रिएट करणार आहेत.
सैफवर हल्ला करणारा आरोपी पैलवान
पोलीस तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी पैलवान असल्याचं समोर आलं आहे. आरोपी मोहम्मद शहजादनं पोलिसांना सांगितलं की, तो बांगलादेशात स्पोर्ट्स खेळायचा. बांग्लादेशातील कुस्तीचा तो पैलवान होता. कमी वजनी गटात तो कुस्ती खेळायचा. त्यानं जिल्हास्तरीय आणि नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये कुस्ती खेळली होती. कुस्तीचा खेळाडू असल्यामुळेच तो सैफ अली खानवर अगदी सहज हल्ला करू शकला.तसेच, आरोपीनं सांगितलं की, बेरोजगारीला कंटाळून तो बांगलादेशातून भारतात आला होता. पण, इथेही कोणतंच योग्य काम मिळत नसल्यामुळे त्यानं पुन्हा मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला होता.